• Pune
  • May 5, 2021
0 Comments
Spread the love

मागील वर्षी जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग ऑगस्टच्या अखेरीस कमी होत आहे असे वाटत असतानाच मधले एक-दोन पंधरवडे सोडल्यास रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढत असल्याने शासनाच्या आरोग्य विभागाबरोबरच सर्व सामान्य जनतेला ही भयानक भीतीने ग्रासले आहे. वास्तविक सरकारने केलेल्या सर्व प्रकारच्या उपाय योजना व नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश आले होते.राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली होती.

परंतु सत्ता हातातून गेल्यामुळे हवालदिल झालेल्या अतृप्त आणि अतिमहत्वाकांक्षी
राजकारण्यांच्या गलिच्छ राजकारणामुळे मध्यंतरी देवळं आणि दारुची दुकानें उघडली गेली. आणि इथूनच कोरोनाने परत उसळी घेतली. कमी झालेली कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि देशात, राज्यात आणि अनेक जिल्ह्यात व तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण देखील सुरु करण्यात आल्यामुळे कोरोना आजाराच्या बाबतीत नागरिकांमधील भीतीचे वातावरण काहीसे कमी होवून लोकांनी ही कोरोना निघून गेल्याच्या भ्रमात स्वच्छतेचे नियम पाळणे सोडून दिले. कोरोना संपल्याची भावना नागरिकांच्या मनात निर्माण झाल्यामुळे शासनाने दिलेल्या नियमांचा नागरिकांना विसर पडला. त्यामुळे चेहऱ्याला मास्क, सामाजिक अंतर व साबण अथवा हँडसॅनिटायझरने आपले हात वारंवार धुण्याचा देखील नागरिकांना विसर पडला. हे सगळे नियम तर सर्वांनी वैयक्तिकरित्या पाळावयाला हवेत.यासाठी प्रत्येकाच्या मागे पोलिस लावणे शक्य नाही आणि ते संयुक्तिकही वाटत नाही.

तरीही ही सरकारच्या आदेशानुसार पोलिस आणि संबंधित आरोग्य खात्याने अधिकाधिक काळजी घेऊन तपासण्या करण्यात कुचराई केली नाही. केवळ लोकांच्या निष्काळजीपणामुळे मागील काही दिवसांपासून देशातील कोरोना बाधित रुग्ण संख्येत वाढ होत असून त्यात महाराष्ट्रातील रोडावलेली कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली असल्याने गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

कोरोना बाधित रुग्णांची वाढणारी संख्या हा चिंतेचा विषय असून नागरिकांनी निष्काळजीपणा टाळून, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणि आपल्या सुरक्षेसाठी शासनाने घालून दिलेले नियम पाळून सहकार्य केले पाहिजे. कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी यापुढे शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केलेच पाहिजे. परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. यापुढे लॉकडाऊन करणे कुणालाही परवडणारे नाही कारण लॉकडाऊनचे दूरगामी परिणाम होवून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे झालेला परिणाम सर्वांनी पाहिले आणि अनुभवले आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबाची योग्य ती काळजी घेवून कोरोना बाधित रुग्ण वाढणार नाही यासाठी यापूर्वी कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी सर्वोतोपरी जशी मदत केली होती तसे.प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागाने देखील कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संभाव्य नागरिकांच्या जास्तीत जास्त तपासण्या कराव्यात.

कोविड केअर सेंटर आणि विलगीकरण कक्ष पुन्हा सुरु केले पाहिजे. कोरोना बाधित रुग्णांसाठी रुग्णालयात उपचार उपलब्ध करून देण्याबरोबरच नागरिकांना आरोग्य बाधित होण्यापासून वाचवले पाहिजे. तरच लॉकडाऊन नको या म्हणण्याला अर्थ आहे. आयुष्यात पैसा पुन्हा कधीतरी मिळवता येईलच.आणि मिळेलही, परंतु आयुष्य पुन्हा मिळणार नाही एवढं जरी आपण सर्वांनी गांभीर्याने विचार केला तरी कोरोना इथून गाशा गुंडाळणार हे लिहून ठेवा इतकेच.

Author

snehal.shelote74@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *