• Pune
  • May 5, 2021
0 Comments
Spread the love

सोलापूर,दि.१५ : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी लागू केलेल्या संचारबंदी आदेशाची बुधवारी रात्री ८ पासून शहर आणि जिल्ह्यात कडक अंमलबजावणी सुरू झाली. संचारबंदी असली तरी नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून अत्यावश्यक सेवेतील किराणा, फळे, भाजीपाला, बेकरी, मांस, चिकन दुकाने, कारखाने, ई – कॉमर्स सेवा तसेच कृषिविषयक दुकाने सुरू राहणार आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहणार असले तरी यामध्ये बनविले जाणारे खाद्यपदार्थ ग्राहकांपर्यंत घरपोच करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि शहरासाठी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी बुधवारी रात्री स्वतंत्रपणे आदेश काढून संचारबंदीच्या नियमावलीची कडकपणे अंमलबजावणी सुरू केली आहे. १ मेपर्यंत संचारबंदीचा आदेश लागू राहणार आहे.

वृत्तपत्र छपाई आणि घरपोच वितरणासाठी सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. नव्या आदेशानुसार होम डिलिव्हरी व पार्सल सेवेला सूट देण्यात आली आहे. महापालिका हद्दीतील बार, रेस्टॉरंट आणि हॉटेल्सला रात्री १० पर्यंत होम डिलिव्हरी आणि पार्सल सेवेला परवानगी राहील. मात्र ग्राहकांना हॉटेलमध्ये जाऊन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार नाही. हातगाड्यांवर खाद्यपदार्थ विकण्यासाठीही परवानगी असून मात्र त्यांना फक्त पार्सलसेवा देता येईल.

होम डिलिव्हरी देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी लसीकरण आणि कोरोना चाचणी करून घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालूच राहणार असून ऑटो रिक्षामध्ये चालक व दोन प्रवासी, चार चाकी वाहनांमध्ये चालक व वाहनाच्या ५० टक्के क्षमतेने प्रवासी वाहतुकीला मुभा असेल. बस वाहतुकीसाठी आरटीओने दिलेल्या पासिंगनुसार पूर्ण क्षमतेने वाहतुकीस परवानगी दिली आहे. मात्र प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येणार नाही. चारचाकी वाहनांत जर कोणत्याही एका व्यक्तीने मास्क घातला नसेल तर त्या टॅक्सी चालकाला व मास्क न घालणाऱ्या व्यक्तीला प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.

ग्रामीण भागासाठी फक्त पार्सल सेवा व घरपोच सेवा सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत तर महापालिका हद्दीत सकाळी ७ ते सायंकाळी ६ यावेळेत सर्व दिवशी सेवा देता येणार आहे. सिनेमा हॉल, नाट्यगृहे ल, सभागृहे वॉटर पार्क, व्यायामशाळा, क्रीडा संकुले बंद राहणार आहेत. धार्मिक स्थळांमध्ये दैनंदिन नित्योपचार सुरू राहतील परंतु सामान्य भाविकांना दर्शन बंद राहील.

केस कर्तनालय, स्पा, सलून व ब्यूटी पार्लर ही दुकाने बंदच राहणार आहेत. मान्सूनपूर्व कामांना परवानगी असून शेतीशी निगडित खते, बी – बियाणे व औषधांची दुकाने चालू राहतील. महापालिका हद्दीत घरगुती काम करणारे कामगार, वाहनचालक, स्वयंपाकी तसेच ज्येष्ठ नागरिक व आजारी लोकांना सेवा देण्यासाठी वैद्यकीय मदतनीस आणि नर्स यांना आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत प्रवास करण्यास परवानगी राहील. मात्र त्यांच्याकडे कोरोना चाचणी व लसीकरण केलेले प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. सर्व प्रकारच्या वित्तीय संस्थांना संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे.

पोटनिवडणुकीसाठी संचारबंदी शिथिल पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात १७ एप्रिल रोजी मतदान होणार असून उद्या ( गुरुवारी ) प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यासाठी सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत निवडणुकीच्या कामासाठी व प्रचारासाठी संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे.

विवाहासाठी २५ तर अंत्यविधीसाठी २० जण
विवाहासाठी २५ जणांना परवानगी देण्यात आली असून अंत्यविधीमध्ये २० जणांनाच सहभागी होता येईल. लग्न सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्यांकडे कोरोना चाचणी व लसीकरण करून घेतल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

Author

snehal.shelote74@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *